लोणावळा वृत्तसंस्था । रायगड जिल्ह्यातील रसायनी येथे स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना आज सकाळी 4:30 वाजेच्या सुमारास ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्यापही समजू शकले नाही आहे. मात्र, स्विफ्ट कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कार (एमएच ११ सीएच १८८९) सजवलेली होती. सातारा येथून लग्नसमारंभ उरकून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.