पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदातील उमेदवारांना नेमणूकी देण्यासंदर्भात मागणी आ. चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक यांनी त्या उमेदवारांना नेमणूक देण्याबाबत आदेशित केल्याने उमेदवारांनी मुख्यमंत्री व आ. चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहे.
राज्यामध्ये २०१९ साली दुष्काळग्रस्त जिल्ह्यासह इतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु, कोरोना महामारीमुळे या भरतीला स्थगिती मिळाली होती. सदर भरती त्यावेळी युतीच्या सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी २०१९ साली काढली होती. परंतु ३ ते ४ वर्ष उलटून गेले तरीही आतापर्यंत सदर उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नसून सद्यस्थितीमध्ये रा.प. महामंडळात कंत्राटी पद्धतीने चालक भरती करून या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. सदरील कंत्राटी पद्धतीची भरती रद्द करून २०१९ मधील दुष्काळग्रस्त व इतर भरतीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी अशी लेखी मागणी आ. चिमणराव पाटील यांनी दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित दखल घेत संबंधित विभागाला तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महाव्यवस्थापक अजित गायकवाड, यांच्या जा.क्र. राप/कर्मवर्ग/म.ब./ससेभ/४३२८ म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आ.ना.मार्ग, मुंबई – ४०० ००८ दिनांक :- ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या आदेशान्वये सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदातील उमेदवारांना नेमणूकी देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयाने २०१९ पासून नियुक्त्यांची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांचा प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे आ. चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले असून उमेदवारांनी देखील मुख्यमंत्री व आ. चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत.