Home Cities यावल नगरपरिषद निवडणूक पारदर्शकतेसाठी उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे मागणी

नगरपरिषद निवडणूक पारदर्शकतेसाठी उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे मागणी

0
104

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषद निवडणुकीतील मतमोजणी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, संपूर्ण प्रक्रियेवर पारदर्शकता व निष्पक्षतेची शिक्कामोर्तब छाप उमटावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा उमेदवारांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुमय्या बी. शेख कुर्बान नगर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या औपचारिक मागण्यांकडे आता सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

सुमय्या शेख यांनी आपल्या निवेदनात मतमोजणी केंद्रातील संभाव्य गैरप्रकार, दबावतंत्र किंवा बाह्य प्रभाव टाळण्यासाठी कठोर उपाय तत्काळ अमलात आणावेत, अशी विनंती केली आहे. मतमोजणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, प्रतिनिधी तसेच पत्रकार – या कोणाच्याही मोबाइल फोनला केंद्रात प्रवेश न देण्याची त्यांनी ठाम मागणी नोंदवली आहे. मोबाईल फोनमुळे गोपनीयता धोक्यात येऊ शकते तसेच विविध मार्गांनी मतमोजणी प्रक्रियेवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

यासोबतच, मतमोजणी प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा स्पष्ट आणि नोंदीत राहावा, यासाठी दोन स्वतंत्र व्हिडिओग्राफीची परवानगी देण्यात यावी, अशीही त्यांची महत्त्वाची मागणी आहे. व्हिडिओग्राफीसाठी आवश्यक असलेला सर्व खर्च आपणच उचलू, अशी हमीही त्यांनी लेखी अर्जात दिली आहे. या सर्व उपायांमुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक विश्वसनीय, शंका-कुशंकांपासून मुक्त आणि सार्वजनिक विश्वासास पात्र ठरेल, असा त्यांचा दावा आहे.

उमेदवार सुमय्या शेख यांनी या मागण्या तातडीने विचारात घेऊन मंजूर कराव्यात, असा पुनरुच्चार करत अर्जाची प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव तसेच फैजपूर नगरपरिषद मतमोजणीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवली आहे. आता आयोग या मागण्यांवर कोणती भूमिका घेतो, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.


Protected Content

Play sound