पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येऊ घातलेल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीचे राजकारण तापले असून २ डिसेंबरच्या मतदानापूर्वी नामनिर्देशन प्रक्रियेतच उमेदवारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याची सक्ती केल्याने तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या समस्या लक्षात घेता प्रतिज्ञापत्रे ऑफलाईन स्वीकारावीत किंवा नामनिर्देशनाची अंतिम मुदत वाढवावी, अशी ठाम मागणी पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे.

१० नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र स्वीकृती सुरू झाली आहे. मात्र, ऑनलाईन प्रतिज्ञापत्र भरताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. एका उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पूर्ण करण्यात तब्बल ७ ते ८ तास लागत आहेत. शिवाय रविवारी नामनिर्देशन स्वीकारणी बंद असल्याने इच्छुकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेक उमेदवार मानसिकदृष्ट्या थकले असून प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी सांगितले की ऑनलाईन फॉर्म भरताना पोर्टल वारंवार बंद पडते, सेशन लॉगआऊट होते आणि अनेक रकान्यांमध्ये ‘निरंक’, ‘N.A.’ किंवा ‘0.00’ भरूनही प्रिंटआऊट ब्लँक मिळत आहे. आयोगाच्या नियमांनुसार सर्व रकाने भरावे आवश्यक असून पोर्टलची संथगती उमेदवारांसाठी मोठी अडचण ठरत आहे. काही उमेदवारांना प्रतिज्ञापत्र पूर्ण करायला १ ते ८ तासांपर्यंत वेळ लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही परिस्थिती लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने त्वरित दखल घेऊन प्रतिज्ञापत्र ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे आदेश द्यावेत किंवा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन आणि माजी नगरसेवक सतीश चेडे उपस्थित होते. मागणीचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



