मुंबई -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तुफानी प्रचाराला आता आणखी वेग मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. वाढीव वेळेमुळे संघटनांना रणनीती आखण्याची आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी होत असून सध्या सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. याआधी प्रचाराची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने मोठा बदल करत ही वेळ 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे उमेदवारांना एक दिवसाहून अधिक अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ नुसार मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजल्यानंतर जाहीर प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आता 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंतच प्रचार करता येणार असून त्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच जाहिरातींचे प्रसारण सक्त मनाई असेल.
प्रचाराची मुदत वाढवण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अपक्ष उमेदवारांचा अडथळा दूर करणे. 26 नोव्हेंबरला या उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचारासाठी अवघे चार दिवसच उपलब्ध होते. वाढीव वेळेमुळे अपक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांना आता मतदारांपर्यंत पोहचण्याची जास्त संधी निर्माण झाली असून त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात नेण्यात येत आहे. राज्यभरातील 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदारांसाठी तब्बल 13 हजार 355 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा, व्यवस्थापन आणि तांत्रिक सोयी-सुविधांचा आढावा सातत्याने घेतला जात असून प्रशासन कोणतीही कसर न ठेवता सज्ज असल्याचे दिसत आहे.



