Home Cities जळगाव सिंधी समाजाच्या विस्थापित जमीन मालकीहक्कासाठी जळगावमध्ये शिबीर संपन्न

सिंधी समाजाच्या विस्थापित जमीन मालकीहक्कासाठी जळगावमध्ये शिबीर संपन्न

0
142

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी समाजाच्या विस्थापित कुटुंबांना त्यांचा हक्काचा जमीन मालकीहक्क मिळावा यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. आमदार राजू मामा भोळे यांच्या पुढाकाराने व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सहकार्याने ४ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पबचत भवन, कलेक्टर कार्यालय येथे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या जमीन मालकीहक्कासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली.

दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याशी विशेष बैठक घेऊन सिंधी समाजाच्या विस्थापित कुटुंबांना जमीन मालकीहक्क प्रमाणपत्र देण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अल्पबचत भवन येथे शिबीर आयोजनाचे निर्देश दिले.

या शिबिरात जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी, सिटी सर्व्हे विभागाचे प्रतिनिधी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकीहक्क प्रक्रियेला चालना मिळाली आहे.

शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह प्रांताधिकारी विनय गोसावी, सिटी सर्वे अधिकारी, मंडळ अधिकारी राजेश भंगाळे, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाशभाई बालानी, माजी मंडळ अध्यक्ष गोपालभाई पोपटानी, मंडळ चिटणीस शाम करमचंदानी, गुरुबक्षजी जाधवानी, कलपेशजी वालेचा, कपिल मेहता, शामलालजी लुंड, विष्णुजी जाधवानी, नानकजी तलरेजा आणि जीतेंद्रजी कुकरेजा हे मान्यवर उपस्थित होते.

सिंधी समाजाच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून, भविष्यात अशा प्रकारचे अधिकाधिक शिबिरे आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सिंधी समाजात समाधानाची भावना असून, त्यांच्या दीर्घकालीन मागणीकडे अखेर लक्ष दिले गेले आहे.


Protected Content

Play sound