जळगाव (प्रतिनिधी) शहरातील देशपांडे मार्केट येथील पुष्पक स्टुडीओ या दुकानातून काल कॅमेरा चोरून नेणाऱ्यास आज जिल्हापेठ पोलीसांनी पाळधी ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत दुकान मालक विजय पुना बारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील जिल्हापेठ स्टेशनला भादवि.क्र.३७९ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार फिर्यादी विजय बारी यांचे सहकारी किशोर सोमनाथ पवार हे १७ मे रोजी सायंकाळी दुकानावर एकटे असताना ते बाथरुमला गेले असता त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवलेला निकॉन कंपनीचा मॉडेल डी-७० हा कॅमेरा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला होता. या गुन्हयाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ.रा.का.पाटील, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, विनोद सुभाष पाटील, दादाभाऊ पाटील यांचे पथक तयार करुन रवाना केले होते.
सदर पथकाने नविन एस.टी.बस स्टॅन्ड परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. फुटेजचे बारकाईने निरीक्षण करुन आरोपी पाळधी, तालुका जामनेर येथील असल्याचे निष्पन्न केले. या आरोपीवर अशांच प्रकारचे शहर पोलीस स्टेशन , एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखलआहेत. त्याला पकडण्याकरीता पाळधी व पहुर येथे सदर पथकाने सापळा लावला असता आरोपी अक्षय प्रकाश छाडेकर (वय -२१) यास अटक करण्यात येवून जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे ताब्यात गुन्हयाच्या तपासासाठी देण्यात आले आहे.