भुसावळ परिसरात उद्या सर्व वैद्यकीय सेवा बंदीचे आवाहन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.

या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.

या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन करतो. अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील.

इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करते.

 

Protected Content