मुंबई, वृत्तसंस्था | महाआघाडी सरकारचे खातेवाटप पक्षांप्रमाणे निश्चित झालेले आहे. उद्या किंवा परवापर्यंत ते जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या भाजपवरही उद्धव यांनी निशाणा साधला.
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या मंत्रिमंडळात असून ही एक ‘बेस्ट टीम’ आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार का, असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकमताने खातेवाटप निश्चित केले आहे. त्यामुळे कोणते खाते कोणाकडे जाणार, याची अधिक चर्चा नको. उद्या किंवा परवा तुम्हाला ते कळेलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आजच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत विचारले असता, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळात घराणेशाहीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, त्यावर बोलताना ‘आम्ही जे करतो ते रोखठोकपणाने आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला.
काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर भाजपने आक्षेप घेतला आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या दया याचिकेवर अस्लम शेख यांनी स्वाक्षरी केली होती, असे नमूद करत हा आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी भाजपवर पलटवार केला. असे प्रश्न आम्हाला विचारणार असाल तर भाजपच्याही बऱ्याच गोष्टींच्या मुळाशी जावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेत नाराजी नाही
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सुनील प्रभू, सुनील राऊत व शिवसेनेचे आणखी काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता माझ्यापर्यंत तरी अद्याप कुणाची नाराजी आलेली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सगळ्यांची इच्छा असली तरी ती पूर्ण करणे शक्य नाही. शेवटी समतोल साधावाच लागतो, असेही उद्धव म्हणाले. महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले नसेल तर त्याची मी माहिती घेईन. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी त्यांना जे द्यायचे आहे, ते आम्ही देणारच आहोत, असेही उद्धव यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.