मुंबई-वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांतील 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकाही जाहीर करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. तसेच बारामतीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती मतदारसंघही रिक्त झाला. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 30 मार्च 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत राहणार असून 7 एप्रिलला अर्जांची छाननी केली जाईल. 9 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 23 एप्रिलला मतदान होऊन 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयोगाने ठेवले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू असल्याने बारामतीत निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राहुरी मतदारसंघात मात्र चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, भाजपकडून दिवंगत आमदारांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
यामुळे बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरणार असून, या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



