नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने तीन लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. केरळमधील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड आणि पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात निवडणूक घेतली जाणार आहे.
राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड येथून विजय मिळवल्यानंतर त्यांनी वायनाडचा राजीनामा दिला होता. तसेच नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाल्यामुळे ही जागाही रिकामी झाली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधील तृणमूल काँग्रेसचे हाजी शेख नुरूल इस्लाम यांचा मृत्यू झाल्यामुळे याठिकाणीही पुन्हा मतदान होणार आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवितील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या निर्णयामुळे प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर लोकांना उद्देशून म्हटले होते की, “तुम्हाला आता दोन खासदार मिळणार आहेत. मी वरचेवर येत राहीन. वायनाडमधील लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांनीच मला खडतर काळात लढण्याची उर्जा दिली.”