Home धर्म-समाज विठ्ठल नामस्मरणाने जीवन पापमुक्त होते – कान्होबा महाराज मोरे

विठ्ठल नामस्मरणाने जीवन पापमुक्त होते – कान्होबा महाराज मोरे


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कलियुगात मानवाच्या जीवनातील दुःख, अशांती आणि मानसिक अस्थिरतेतून मुक्त होण्यासाठी विठ्ठल नामजप हा सर्वांत सुलभ, सोपा आणि प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन श्री संत कान्होबा महाराज मोरे यांनी केले. श्रद्धेने ‘विठ्ठल, विठ्ठल’ या नामाचा जप केल्यास मनुष्य पापमुक्त होतो आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

फैजपूर येथे आयोजित सामूहिक तुळशी अर्चन महोत्सवाच्या दुसऱ्या कीर्तनपुष्पात बोलताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या कान्होबा महाराज मोरे यांनी विठ्ठल भक्तीचे महत्त्व विशद केले. जीवनात येणारी दुःखे ही पूर्वजन्मातील पापांचे परिणाम असतात आणि त्यातून मुक्त होण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा प्रभावी मार्ग नाही, असे त्यांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले. विठ्ठल नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, अहंकार नष्ट होतो आणि भक्तीमार्ग अधिक दृढ होतो, असेही त्यांनी सांगितले.

या धर्ममंडपात दुपारी नैमिषारण्य (उत्तर प्रदेश) येथील प्रसिद्ध कथाव्यास शैलेंद्र शास्त्री यांच्या रामायण कथेचा भक्तिमय प्रारंभ झाला. आजच्या सत्रात त्यांनी भगवान महादेवांनी माता पार्वतीवर केलेल्या प्रेमवर्षावाची हृदयस्पर्शी कथा सांगितली. शिव–पार्वती यांचे प्रेम हे कुटुंबात प्रेम, समर्पण, विश्वास आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचा संदेश देते, असे त्यांनी भाविकांना पटवून दिले.

रामायण कथेच्या प्रारंभी शैलेंद्र शास्त्री यांनी त्रिदेवांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. भगवान ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, भगवान विष्णू पालनपोषण करतात आणि भगवान महादेव सृष्टीचा समतोल राखतात, त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव समानरीत्या पूजनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या ओघवत्या वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

या धार्मिक कार्यक्रमास माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी भेट देत कथाव्यास शैलेंद्र शास्त्री यांचा सत्कार केला. आपल्या मनोगतात त्यांनी आयोजकांचे कौतुक करत अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सद्भावना आणि संस्कार वृद्धिंगत होतात, असे सांगून भाविकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे निमंत्रक नरेंद्र नारखेडे, अध्यक्ष निळकंठ सराफ तसेच आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी कीर्तन व रामायण कथेचा लाभ घेत भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला आणि संपूर्ण परिसर ‘विठ्ठल’ नामस्मरणाने भारावून गेला.


Protected Content

Play sound