रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या श्रीकृष्ण पार्क येथील रिक्षा चालकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे आणि रोकड असा एकूण १ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिल मधुकर वाणी (वय-६०) रा. श्रीकृष्ण पार्क, पिंप्राळा जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे, रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात, बुधवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता ते बाहेरगावी नातेवाईक यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेऊन घरफोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण १ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आला, त्यांनी घरी येऊन पाहणी केले असता घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला, त्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.