Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरातील व्यावसायिक विनोद सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुक्ताईनगरातील व्यावसायिक विनोद सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघाच्या राजकीय पटावर महत्त्वाची घडामोड घडली असून येथील नामांकित व्यावसायिक आणि योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या सोनवणे यांच्या या अचानक झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

विनोद सोनवणे हे सुरुवातीपासूनच आमदार एकनाथराव खडसे यांचे निकटवर्ती मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून न पाहता, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची चाल म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क मांडले जात असून अनेक राजकीय घडामोडींचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.

येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभावी भूमिका बजावण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जात असून, सोनवणे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला निश्चितच बळ मिळेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

जळगाव येथे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी विनोद सोनवणे यांनी भाजपमध्ये एकनिष्ठपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशामुळे मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः व्यावसायिक, युवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश भाजपसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound