चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील बसस्थानकांना अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त करण्यासाठी “बांधा, वापरा, हस्तांतरित करा” या तत्त्वावर आधारित विकासावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि अंबोली या बसस्थानकांचा विकास, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
विधानभवनात आयोजित राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांवरील बैठकीत परिवहनमंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीस माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार चंद्रकांत सोनावणे, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तसेच आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते.
परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, “शहर, तालुका आणि ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि अंबोली ही बसस्थानके विकसित केली जातील.” यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी अंबोली बसस्थानकाचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्व अधोरेखित करत, सर्व सुविधायुक्त नवीन बसस्थानक उभारण्याची सूचना केली. तसेच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची स्थानिकांची मागणी विचारात घ्यावी, असे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुचवले. यावर मंत्री सरनाईक यांनी लवकरच निर्णय घेऊन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक करण्याबाबत स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी मागणी केली. मध्य प्रदेशच्या सीमेवरील आदिवासीबहुल चोपडा तालुक्यातील हे महत्त्वाचे बसस्थानक अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज व्हावे, असे त्यांनी सुचवले. याबाबत तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून “बांधा, वापरा, हस्तांतरित करा” या तत्त्वावर बसस्थानकाचा विकास करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य परिवहन विभागाच्या या प्रयत्नांमुळे प्रवाशांना सुविधाजनक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील संपर्क सुधारण्यास मदत होईल.