रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या सहा दिवसांपासून रावेर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या ‘निळे निशाण’ सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला अखेर ऐतिहासिक यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून जाणाऱ्या आणि मध्य प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला आता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या मागणीसह रावेर शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याच्या मागणीवरही प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे.
अन्न-त्याग आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ :
२३ मार्च २०२६ पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाच्या संथ भूमिकेमुळे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी २६ मार्चपासून अन्न-पाण्याचा त्याग करत ‘आमरण उपोषण’ सुरू केले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगर परिषदेने तात्काळ सर्वसाधारण सभा बोलावली. NHAI च्या संमतीनुसार महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ढोल-ताशांच्या गजरात भीमसैनिकांचा जल्लोष :
या विजयानंतर रावेर शहरात उत्साहाचे वातावरण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि भीमघोषात हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी आनंदभाऊ बाविस्कर यांनी नायब तहसीलदार संजय तायडे आणि मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे आभार मानले. “हे यश केवळ एका संघटनेचे नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा हा मोठा गौरव आहे,” अशा भावना बाविस्कर यांनी व्यक्त केल्या.
मान्यवरांची उपस्थिती आणि सहभाग :
या ऐतिहासिक प्रसंगी नगरसेविका अनिता तायडे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, ॲड. दीपक तायडे, पंकज वाघ, प्रदीप सपकाळे यांसह निळे निशाण संघटनेचे सदाशिव निकम, संजय तायडे, विलास तायडे, महेंद्र कोचुरे, नंदा बाविस्कर, संगीताबाई घेटे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. महामार्गाच्या या नामकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.



