जळगाव, प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा व शिरसोली रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ अशा दोन भागात गेल्या २४ तासात दोन ठिकाणी घरफोडी होवून एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेत तांबापुरा भागातील मशिदीजवळ राहणाऱ्या नाजीयाबी शेख असलम हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, काल (दि.३) सायंकाळी ८.०० वाजेच्या सुमारास ती दुकानावर किराणा आणण्यासाठी गेली असताना घरात कुणीच नव्हते, त्यामुळे दाराला कडी लावून ती गेली होती. परत येताना तिचा पती असलमही सोबत होता. घरात आल्यावर त्यांना तोंडाला रुमाल बांधलेला एक उंच, गोरा व सडपातळ अनोळखी व्यक्ती कपाटाजवळ उभा दिसला, त्याच्या हातात पैसे व मोबाईल होता. तो निघण्याच्याच बेतात होता. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हातातली सळई उगारून मारण्याची धमकी दिली व आम्हाला धक्का मारून पळून गेला. त्याने घरातून २७०० रुपये रोख व मोबाईल चोरून नेला आहे.
दुसऱ्या घटनेत शिरसोली रोडवर गुंजन मंगल कार्यालयासमोर राहणाऱ्या सुनिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज (दि.४) सकाळी योगा क्लाससाठी गेल्या असता घराला कुलूप लावलेले होते. त्या ७.३० च्या सुमारास परत आल्या तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात बघितले असता त्यांना वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या, त्यात रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने मिळून सुमारे ८२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही फिर्यादीनुसार एकूण सुमारे ८५ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.