Home क्राईम सोनी नगरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद !

सोनी नगरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना गुरूवारी ४ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री घडल्याची माहिती आहे.

सोनी नगरात राहणारे गणेश भगवान माळी हे ३० नोव्हेंबरपासून सहकुटुंब मूळ गावी गेले होते. ४ डिसेंबर, गुरुवारी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी दरवाजा तुटलेला असल्याची माहिती त्यांना फोनवरून दिली. माळी कुटुंब तातडीने घरी परतले असता, त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडलेले आढळले. चोरट्यांनी घरातून तीन तोळे सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र आणि ६ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा सुमारे १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता.

याच गल्लीत राहणारे सुनिल रामदास सुरवाडे यांचेही बंद घर चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटेच्या सुमारास तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले चार संशयित चोरटे या फुटेजमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी आता या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा कसून शोध सुरू केला आहे. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound