जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुनाखेडी रोडवरील सदाशिव नगरात राहणाऱ्या एका तरुणाचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५८ हजार २८५ रुपयांचा ऐवज चोरून गेल्याची घटना मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन नीना सुरवाडे वय-३१, रा.सदाशिव नगर, जुनाखेडी रोड, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ ते २३ जुलै दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराचा दरवाजाच्या काडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५८ हजार २८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली. त्यानुसार नितीन सुरवाडे यांनी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार हे करीत आहे.