पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात भरदिवसा धाडसी चोरीची घटना उघडकीस आली असून ए वन सलूनचे मालक प्रवीण उर्फ भावडू जगताप यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दुपारी जगताप यांची पत्नी मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्याच दरम्यान चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश मिळवला. अल्प वेळात घरातील सामानाची उचथापालथ करून चोरट्यांनी अंदाजे २० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. जगताप यांची पत्नी घरी परत आल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेला आणि सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसताच त्यांनी तत्काळ आपले पती भावडू जगताप यांना फोन करून संपूर्ण घडलेला प्रकार कळवला.

घटनेची माहिती मिळताच जगताप यांनी तातडीने पारोळा पोलिस ठाण्यात संपर्क साधला असून चोरीबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत प्राथमिक तपास सुरू केला आहे. ही चोरी भरदिवसा झाल्याने आणि चोरट्यांनी निर्भयपणे दरवाजाची कडी-कोयंडा तोडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.



