भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोपाळ नगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ९९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता लखन सुखराज शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन शर्मा हे भुसावळ येथील डी.एल. हिंदी हायस्कूलच्या मागे, गोपाळ नगर परिसरात वास्तव्यास आहेत. २४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान शर्मा यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून ८५ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला.

इतकेच नव्हे तर, त्याच दरम्यान परिसरातील आणखी एका घरातून १४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २९०० रुपये रोख चोरून नेले. दोन्ही घरातून असा एकूण ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. फिर्यादी शर्मा हे घरी परतल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहेत.



