जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अयोध्या नगरमध्ये घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. स्वामी दर्शन अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार ७५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी संधी साधली
फिर्यादी आरती कृष्णा शिंपी (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या कुटुंबीयांसह २७ ऑगस्ट रोजी मुंबई आणि सुरत येथे गेल्या होत्या. १० दिवसांनंतर, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी सकाळी त्या परत आल्या तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडेच असताना, चोरट्यांनी त्यातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने चोरून नेले. या चोरीमध्ये आरती शिंपी यांच्यासह त्यांच्या मैत्रिण बेबाबाई खोडपे यांचेही काही दागिने होते.

पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो.नि. बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. या चोरीच्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



