जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात बनावट चावीचा वापर करून अज्ञात व्यक्तीने घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमालाची चोरी केल्याचे शुक्रवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीला आले. आठ दिवसानंतर शनिवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पवन हिरालाल लालवाणी (वय-३२) रा. सिंधी कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पवन हे खासगी नोकरी करतात. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. सायंकाळी ६.३० वाजता घरी आले तेव्हा घराचे कुलूप उघडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा वापर करून लोखंडी कपाटात ठेवलेले २२ हजार ५०० रूपयांची रोकड आणि २९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला. सुरूवातीला शोधाशोध केली परंतू चोरीची माहिती मिळाली नाही. अखेर शनिवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीसात धाव घेतली व अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.