मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या कवितांमधून वंचित कष्टकरी वर्गाच्या वेदना मांडणारे कवी म्हणून पद्मश्री नारायण सुर्वे ओळखले जात होते. त्यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पण चोराने काही दिवसात चोरी केलेले सर्व सामान परत केले असून सोबत एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने सुर्वे कुटुंबीयांची माफी मागितली आहे. रविवारी दिवंगत कवी नारायण सुर्वे यांची मुलगी आणि जावई घरी नसताना ही चोरी झाली. नेरळ येथील घरात चोरी झाल्याचे कळताच नारायण सुर्वे यांच्या मुलीने पोलिसात धाव घेतली. तिने तक्रार दाखल केली. पण चोराला जेव्हा कळाले की ते दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे तेव्हा त्याने माफीनामा लिहून घरातून चोरी केलेल्या सर्व वस्तू परत आणून दिल्या आहेत.
नेरळ येथील गंगानगर परिसरात दिवगंत कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे. सध्या या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचे हेरत चोराने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे चोराला सापडले नाहीत. त्यामुळे चोराने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्याकडे मोर्चा वळवला. सलग दोन-तीन दिवस चोर घरातील साहित्यावर डल्ला मारत होता. दरम्यान, चोराला घरातील एका भींतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. तसेच आजूबाजूला ठेवलेली त्यांटी स्मृतीचिन्हे, पुरस्कार देखील दिसले. चोरी करत असलेले घर हे नारायण सुर्वे यांचे आहे हे कळताच चोराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने घरातून चोरी केलेल्या सर्व वस्तू पुन्हा घरात आणून ठेवल्या. चोरून नेलेला एलईडी टीव्ही पुन्हा भिंतीवर लावला आणि सोबत एक चिठ्ठी लिहित आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
“मला कल्पना नव्हती हे घर नारायण सुर्वे यांचे आहे. नाही तर मी चोरीच केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला. सॉरी..” असे चोराने चिठ्ठीमध्ये लिहिले. नारायण सुर्वे यांच्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणी तपाय सुरु आहे. चोराने वस्तू पुन्हा आणून ठेवल्यामुळे त्यावरील बोटांचे ठसे, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला चोराचा चेहरा ओळण्याचा प्रयत्न केला जात आहे.