
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी साहेब यांनी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांच्या अंमलबजावणीतूनच पाचोरा पोलिसांनी भातखंडे खुर्द येथे झालेल्या एका घरफोडीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,१० नोव्हेंबर २०२५ रोजी भातखंडे खुर्द येथील रहिवासी सोपान भिकन कुमावत (वय ५१) हे लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि ४१ हजार ५०० रुपये किमतीची रोकड चोरून नेली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५, रा. भातखंडे खुर्द) याचा शोध घेतला. त्याला भातखंडे खुर्द येथे ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अवघ्या ४ तासांत जप्त केला आहे.



