विजेच्या धक्क्याने बैल ठार; सुदैवाने शेतकरी बचावला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारातील शेतात कोळपणी करत असतांना विजेच्या लोखंडी खंब्याला धक्का लागल्याने बैल जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील शेतकरी रघुनाथ मोहन बच्छे यांच्या शेतात बापू आनंदा पवार हे स्वता:ची बैलजोडी व कोळपणीसाठी लागणारा औत, फाटा घेऊन रोजंदारीवर कोळपणी करण्यासाठी आलेले होते. नियमितप्रमाणे कोळपणी सुरु होती. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास कोळपणी सुरू  असतांना शेतात उभ्या असलेल्या विद्यूत खांबाजवळून जात असतांनाच अचानकपणे विद्युत खांबाला बैलाचा स्पर्श झाला. बैल का थांबला लक्षात येताच बापू पाटील यांनी बैलाला काठीचा धक्का लाऊन त्याला हाकण्यासाठी प्रयत्न केला, मात्र काही कळण्याच्या आतच बैलाने जोरदार हंबरडा फोडला बैल क्षणार्धात जमिनीवर कोसळला. ही घटना घडताच विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरलेला असावा व विद्युत करंट लागल्याने बैल खाली पडला असावा असा अंदाज बांधून सावधानता बाळगत बैलाला स्पर्श न करताच बापु पवार यांनी इतर लोकांना आवाज देऊन घडलेली घटना निर्दशनास आणून दिली.

 

घटनेची माहीती कळताच सातगाव (डोंगरी) येथील मोहन बच्छे, विजय राजपूत, सरपंच सुभाष पाटील व शिक्षक उत्तमराव मनगटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बैलाला कोणीही हात लाऊ नये अशा सूचना देऊन विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता हेमंत तिवारी यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांना सोबत येवुन हेमंत तिवारी यांनी घटनास्थळाचा विद्युत पुरवठा बंद करुन तात्काळ दुरुस्ती केली. तसेच अपघातात ठार झालेल्या बैलाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी यांना बोलावून घेत घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा करुन ही माहिती वरिष्ठांना कळविली. या अकस्मात घडलेल्या घटनेत (अपघातात) सत्तर हजार रुपये किंमतीचा बैल ठार झाल्यामुळे याच बैलांच्या मदतीने रोजी, रोटी कमावणाऱ्या बापू पवार यांच्या उत्पन्नाचे साधन गेल्याने बापू पवार हे हतबल झाले असून आता त्यांच्या समोर संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी विद्युत वितरण कंपनी तसेच शासनाकडून या शेत मजुराला त्वरित मदत मिळावी अशी मागणी जनमानसातून केली जात आहे.

Protected Content