खामगाव प्रतिनिधी । ‘मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ हा मोलाचा संदेश देण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका पुढाकार घेत आहे. आज 15 जानेवारीला मकर संक्रांतीपासून कन्या जन्माचे स्वागत केले जाणार असून मातेला साडीचोळी आणि बाळाला जपला दिला जाईल त्यासाठी परिचारिका स्वतःचा खर्च करणार आहेत.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.लेश टापरे यांचे पुढाकाराने हा उपक्रम नियमित सुरू ठेवला जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात शासनाच्यावतीने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो. या उपक्रमाची अजून जागृती व्हावी, कन्या जन्माचे स्वागत व्हावे. यासाठी आता सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. एका बाजूला मुलींना कमी लेखणारी मुलींच्या विरुद्ध असलेली समाजरचना आणि दुसऱ्या बाजूला सहजरीत्या मिळू शकणारी परवडू शकणारे गर्भलिंग परीक्षणची सोय आणि त्यासंबंधीचा प्रयोग करण्याची प्रवृत्ती यासाठी स्त्री-भ्रूण हत्येत वाढ होऊन बाल लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेलेले दिसते त्यासाठी सरकारने मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजना सुरु केली आहे. मुलींच्या कमी होत जाणाऱ्या जन्मदर यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी ही योजना 2014च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली आहे. त्यामुळे आता ही देशव्यापी मोहीम चळवळ बनली आहे. मात्र समाजात अजूनही पाहिजे तशी जागृती नाही त्यासाठी आता खामगावात जन्माचे स्वागत हा उपक्रम राबविला जाणार आहे.