यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बु॥ येथे आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने लागलेल्या शॉकमुळे एक म्हैस दगावल्याची घटना घडली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, किनगाव गावात राहणारे प्रदीप नथ्थु पाटील यांच्या गोठयाजवळ पाश्चिम बाजुस असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाला चिटकुन त्यांची म्हैस आज (दि.६) दगावली. या घटनेची माहिती कळताच किनगाव विभागाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता पंकज कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी येवुन त्या परिसराचा विद्युत पुरवठा बंद केला. किनगाव बु॥चे मंडळ अधिकारी सचिन तुळशीराम जगताप, सरपंच टीकाराम पाटील, आणि किनगावचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. भगुरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असुन, प्रदीप पाटील यांची सुमारे ६५ हजार रुपये किमतीची म्हैस ही विद्युत खांबास चिटकुन शॉक लागुन मरण पावल्याचा पंचनाम्यात उल्लेख करण्यात आला आहे. म्हैशीला शॉक लागला त्या वेळेस याच परिसरातील अजुन काही खांबांवर विद्युत प्रवाह उतरल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत म्हैस दगावली मात्र सुदैवाने मनुष्य जीवित हानी टळल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत.