मुंबई प्रतिनिधी । येत्या एक फेब्रुवारीला ‘अर्थसंकल्प’ सादर होणार असून केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’ अंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीस करसवलत देण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पबचत योजना विशेषत : पीपीएफ आणि एनएससीवर वाढीव करसवलत देण्याचा विचार अर्थ मंत्रालय करीत आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, वार्षिक बचतीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर त्यांच्या हाती मोठी रक्कम उरेल. सध्या प्राप्तिकराच्या कलम ‘८० सी’ अंतर्गत करसवलतीची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपये आहे. त्यामध्ये पीपीएफ आणि एनएससीचा समावेश होता. आर्थिक वर्ष २०१८मध्ये देशातील घरगुती बचतीचा दर कमी होऊन ‘जीडीपी’च्या १७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. आर्थिक वर्ष २०१२मध्ये हाच दर २३.६ टक्क्यांवर होता. आर्थिक वर्ष २०१९मधील हा दर अद्याप जाहीर झालेला नाही.