जळगाव प्रतिनिधी । आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गियांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात अशोक जैन म्हणाले की, हंगामी अर्थमंत्री म्हणून पियूष गोयल यांनी स्वत: लेखा परीक्षक (सीए) असल्याने त्यांच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करून अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात समाजाच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आजचा अर्थसंकल्प आहे. शेतकर्यांसाठी विविध योजनांची घोषणा अर्थमंत्री पियूष गोयल यांनी केली आहे. अल्प-भूधारक शेतकर्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्याने शेतकर्यांच्या जीवनात निश्चित फरक पडेल. भविष्यात शेतकर्यांसाठी विविध योजना आकारास येऊ शकतील आणि शेतकर्यांचे जीवन निश्चितच उंचावू शकेल असे वाटते. कामगारांच्या दृष्टीकोनातून या सरकारने काही चांगल्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत.
याशिवाय, मध्यमवर्गीयांना कराच्या मर्यादेत ऐतिहासीक वाढ करून मोठा दिलासाच दिला आहे. या सवलतीमुळे मध्यमवर्गीय या वाचणार्या रकमेतून विविध प्रकारची खरेदी किंवा त्यांचा गुंतवणूकीकडे कल वाढणार असल्याने बाजारपेठेला नक्की चालना मिळणार आहे. गुंतवणुक व गृहकर्जासाठी आठ लाखापर्यंत उत्पन्नावर करमाफी देण्यात आली आहे ही गोष्ट देखील सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची आहे. या निर्णयामुळे घर बांधणीसाठी लागणार्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या सरकारने प्रथमच संरक्षण विभागासाठी तब्बल ३ लाख कोटींची भरीव तरतूद केली आहे. देशाचे संरक्षण उत्तम प्रकारे व्हावे, यासाठीची ही तरतूद निश्चितच नोंद घेण्याजोगी आहे. पंतप्रधान मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांच्या अशा पल्लवीत करणाराच आहेत.