वाराणसी (वृत्तसंस्था) अवघ्या देशाचे लक्ष लागुन असलेल्या वाराणसी मतदारसंघातून सपा-बसपा महाआघाडीने अखेर नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे.
सपा-बसपा आघाडीत वाराणसीची जागा सपाच्या वाट्याला आली असून सपाने येथून शालिनी यादव यांना आधी उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी वाराणसीच्या उमेदवारीवरून बरीच उलट-सुलट चर्चा झाली. शालिनी यादव आणि तेज बहादूर यादव या दोघांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर वाराणसीत तेज बहादूर हेच सपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. शालिनी यादव आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असेही सपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेज बहादूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा सपाचे प्रदेश प्रवक्ते मनोज राय धूपचंडी त्यांच्यासोबत होते. त्यांनीही शालिनी यादव माघार घेतील, असे सांगितले.
तेज बहादूर यांनी बीएसएफमध्ये जवानांना मिळत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांबाबत आवाज उठवला होता. त्याचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी होऊन तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आले होते.