पुणे प्रतिनिधी । जेसीबीने बैलाची क्रूर हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथे बैलाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या व त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात भारतीय दंडसंहिता तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल गुन्हा दाखल केल्यानंतर आज भिगवण पोलिसांनी बैलाला मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त केला आहे. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. शिवाय पुरलेला बैल उकरण्यासाठी पोलिसांनी पशूवैद्यकीय विभागाला पत्रव्यवहार केला आहे. भिगवण पोलिसांनी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे या दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने पिसाळलेल्या बैलाला निर्घृणपणे ठार केले.
बैल पिसाळल्याने हत्या
हत्या करण्यात आलेला बैल हा पिसाळलेला होता असं सांगण्यात येत आहे. पिसाळल्यामुळे या बैलाची परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने त्याला ठार केल्याचं सांगण्यात येत आहे. पिसाळलेल्या बैलाची जेसीबीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचा एक व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. तसेच, बैलाला ठार केल्यानंतर पिसाळलेल्या बैलापासून सुटका झाल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुण्याच्या इंदापूरचा असल्याचं आता समोर आलं आहे.