पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विहिरीवरील पाण्याची मोटार का बंद केली, या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाने आपल्याच भावावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण शिवारात शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू देवराम पाटील (वय ५२, रा. दगडी सबगव्हाण) हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील सामाईक विहिरीवर पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा भाऊ समाधान देवराम पाटील हा तिथे आला. “तू माझी पाण्याची मोटार का बंद केली?” असे विचारत त्याने दगडू पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयित आरोपी समाधान पाटील याने आपल्या हातातील लाकडी दांडक्याने भाऊ दगडू पाटील यांच्या डाव्या हातावर, नाकावर आणि डोक्यावर जोरदार मारहाण केली. यामध्ये दगडू पाटील हे रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई या घटनेनंतर जखमी दगडू पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी समाधान देवराम पाटील याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



