Home Cities जळगाव ग. गो. बेंडाळे हायस्कुलमध्ये उद्या ब्रॉंझ पुतळा व फोटो अनावरण सोहळा

ग. गो. बेंडाळे हायस्कुलमध्ये उद्या ब्रॉंझ पुतळा व फोटो अनावरण सोहळा

0
140

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांचा दीप प्रज्वलित ठेवण्याच्या ध्येयाने कार्यरत शिक्षण विकास मंडळ, विवरे ता. रावेर यांच्या वतीने श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कुलमध्ये कै. गणपत गोविंदा बेंडाळे यांच्या ब्रॉंझ धातूच्या अर्धशीर्ष पुतळ्याचे तसेच कै. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या फोटोचे अनावरण सोहळे उद्या शनिवारी (१५ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. या सोहळ्याची गावात मोठी उत्सुकता असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या अनावरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी खासदार आणि गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास वासुदेव पाटील भूषवणार आहेत. कै. गणपत गोविंदा बेंडाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. तर कै. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या फोटोचे अनावरण आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते पार पडणार असून उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने होणार असून हे दीपप्रज्वलन शिक्षक आमदार किशोर दराडे आणि सहकार महर्षी व ज्येष्ठ शिक्षक नेते श्री. एस. भिरूड यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर सरस्वती पूजनाचा सोहळा पदवीधर आमदार सत्यजित तांबे आणि माजी अध्यक्ष ग. स. सोसायटी, जळगाव उदय मधुकर पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमुळे कार्यक्रमाला एक वेगळे औचित्य प्राप्त झाले आहे.

यावेळी आयोजित स्मरणिकेचे प्रकाशन माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि भाजपा जिल्हा चिटणीस डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच कार्यक्रमातील विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अनावरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिक्षण विकास मंडळाने दिली आहे. मंडळाचे चेअरमन शैलेश रमेश राणे तसेच उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound