Home आंतरराष्ट्रीय  US-इस्रायलला साथ देत ब्रिटनची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी तैनात

 US-इस्रायलला साथ देत ब्रिटनची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी तैनात


वाशिंग्टन –  वृत्तसेवा । मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाला जवळपास तीन आठवडे पूर्ण होत असताना परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. अमेरिकेकडून इराणवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर आता ब्रिटननेही निर्णायक पाऊल उचलत होर्मुझ सामुद्रधुनीजवळ आपली अत्याधुनिक अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी तैनात केली आहे, ज्यामुळे या युद्धाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने इराणला कठोर इशारे दिले असून, संभाव्य सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. या घडामोडींमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली HMS Anson ही पाणबुडी अरबी समुद्रात होर्मुझ सामुद्रधुनीच्या जवळ पोहोचली आहे, जे या प्रदेशातील सामरिक संतुलन बदलणारे पाऊल मानले जात आहे.

ही पाणबुडी या महिन्याच्या सुरुवातीला, ६ मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून रवाना झाली होती. दीर्घ प्रवासानंतर ती आता अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागात पोहोचली असून, होर्मुझ सामुद्रधुनीवर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कोणतीही लष्करी हालचाल आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम घडवू शकते.

ब्रिटनची HMS Anson ही अत्याधुनिक अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी असून ती अत्यंत प्रगत शस्त्रसामग्रीने सुसज्ज आहे. या पाणबुडीमध्ये सुमारे १६०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करणारी टॉमहॉक ब्लॉक लँड अटॅक क्षेपणास्त्रे तसेच स्पीयरफिश हेवीवेट टॉरपिडो यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक शस्त्रास्त्रामुळे HMS Anson ला अत्यंत मारक आणि प्रभावी युद्धक्षमता प्राप्त झाली आहे, ज्यामुळे ती संभाव्य संघर्षात निर्णायक ठरू शकते.

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ ब्रिटिश पाणबुडीची तैनाती ही केवळ संरक्षणात्मक उपाययोजना नसून, ब्रिटन आता अमेरिके आणि इस्रायलसोबत इराणविरुद्धच्या संभाव्य युद्धात सक्रियपणे सहभागी होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत मानले जात आहेत. याआधीही ब्रिटनने अमेरिकेला इराणविरुद्धच्या कारवाईसाठी आपल्या लष्करी तळांचा वापर करण्यास परवानगी दिली होती, त्यामुळे या नव्या तैनातीने तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound