Home Cities यावल किनगाव खुर्द येथे ७ लाखांचा पुल निकृष्ट; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा...

किनगाव खुर्द येथे ७ लाखांचा पुल निकृष्ट; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथे दफनभूमीजवळ जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात आलेल्या छोट्या पुल व गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सरफराज पिंजारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे ७ लाख रुपये खर्च करून सिडी वर्क आणि गटार बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या कामात शासनाच्या अटी-शर्ती आणि तांत्रिक निकषांचे पालन न करता ठेकेदार व संबंधित अभियंत्यांनी संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सरफराज पिंजारी यांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे सविस्तर तक्रार सादर केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पुल व गटार बांधकामात वापरलेले साहित्य निकृष्ट असून कामाची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. शासनाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये अशा प्रकारची अनियमितता ही गंभीर बाब असून, संबंधित ठेकेदार व अभियंत्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बिलाची रक्कम अदा करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेतली नाही, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत यावल आणि रावेर तालुक्यात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेबाबतही अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित कामांची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. या प्रकरणामुळे विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

 


Protected Content

Play sound