जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेट्रोल पंपासाठी लागणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील एका आरेखकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ही कारवाई सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तक्रारदार व्यक्तीने आपल्या पेट्रोल पंपाच्या एनओसीसाठी भुसावळ येथील संबंधित कार्यालयात अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आरेखक वासुदेव पाथरवट याने प्रथम ‘खुशाली’ म्हणून २ हजार रुपये आणि काम पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये देण्याची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

लाचेची मागणी मान्य नसल्याने तक्रारदाराने तातडीने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि पाथरवटविरोधात तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता लाचखोर पाथरवट यांनी तक्रारदाराकडून ठरलेली १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान लाचेची रक्कम आणि महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी वासुदेव पाथरवट याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. शासकीय कामांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे इतर भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.



