जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली. तक्रारीवरून लावलेल्या सापळ्यात एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागणीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची सत्यता पडताळली आणि शुक्रवारी ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा रचला. या सापळ्यात अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावरील एका व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, एसीबीचे पथक आरोग्य विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत असून त्यांच्याकडून या प्रकरणासंबंधित माहिती घेत आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद येथे खळबळ उडाली आहे. जळगाव लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पथक या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई करत आहे.