गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो असून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य असल्यामुळे आम्हाला दुसर्या गटाचे नाव घेण्याची गरज नाही, आम्हीच मूळ शिवसेना आहोत, अशी भूमिका आज एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आज गुवाहाटी येथून पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, शिंदे यांनीच मला पत्रकार परिषद घ्यायला सांगितले. ते प्रथम म्हणाले की, आम्ही अजून देखील पक्षातच आहोत. पक्षातील आमदारांची मते लक्षात घ्यावी लागतात. आम्ही पक्षप्रमुखांना अनेकदा सुचविले होते. यात आपण युतीमध्ये राहिलो त्यांच्यासोबत राहूया असे सांगितले होते. मात्र यावर निर्णय झालेला नाही. शिंदे साहेबांच्या संपर्कात आम्ही होतो. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने आम्ही घटनात्मक दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या १६ आमदारांना अपात्र करण्याच्या दिलेल्या नोटीसा बेकायदेशीर असून याला आम्ही आव्हान देत असल्याचे ते म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही शिवसेनेपेक्षा वेगळे नाहीत. यामुळे आम्ही शिवसेनेच्या गटाचे वेगळे नाव मागितलेले नाही. या गटाचे नेते एकनाथ शिंदे असतील असे त्यांनी जाहीर केले. व्हीप काढल्यानंतर तो सदनात मोडला तरच अपात्र करता येते. मात्र मिटींगला आले नाही म्हणून नोटीसा दिल्या जातात हे योग्य नसल्याचे केसरकर म्हणाले. जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, लोकांना चिथावणी दिली जाते हे चुकीचे आहे. आपल्याला जे सांगितले जाते व प्रत्यक्ष स्थिती यांच्यातील फरक समजून घ्या. बाळासाहेबांचा विचारच आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.