ब्रेकींग : मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा; तहसील आवारात नातेवाईकांचा आक्रोश !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे एसआरपीएफच्या भरतीसाठी गेलेल्या अक्षय बिऱ्हाडे या तरूणाचा मैदानी चाचणीत चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी घडली होती. या विद्यार्थ्यांला वेळेवर उपचार न मिळाल्याने जबाबदार असलेल्या भरती अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मागणीसाठी मयत तरूणाच्या नातेवाईकांनी रविवारी ३० जून रोजी सकाळी ९.३० तरूणाचा मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयात आणून आंदोलन केले. अक्षय मिलींद बिऱ्हाडे वय-२४ रा. प्रबुद्ध कॉलनी, अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

अमळनेर शहरातील प्रबुद्ध कॉलनीत अक्षय बिऱ्हाडे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. २८ जून रोजी तो एसआरपीएफच्या भरतीसाठी गेलेला होता. त्यावेळी मैदाणी चाचणी दरम्यान त्याला चक्कर येवून पडल्याचे त्याचा दुदैवी मृत्यू झाला. अक्षयला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान रविवारी ३० जून रोजी सकाळी ९.३० वाजता अक्षयचा मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयात आणण्यात आला. यावेळी नातवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. अक्षयच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या भरतीच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी केली. दरम्यान परिस्थिती गांभीर्य पाहता नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी नातेवाईकांना लेखी आश्वासन दिले. हे पत्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही पाठविण्यात आले आहे. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी अक्षयच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Protected Content