Home Cities जळगाव ब्रेकींग : गोळीबाराने जळगाव हादरले; जुन्या वादातून घडली घटना, एसपींची माहिती

ब्रेकींग : गोळीबाराने जळगाव हादरले; जुन्या वादातून घडली घटना, एसपींची माहिती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शहरात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, हा गोळीबार राजकीय वादातून नसून वैयक्तिक वादातून झाल्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

पिंप्राळा भागात गोळीबाराचा थरार :
आज सकाळपासूनच शहरात मतदानाची धामधूम सुरू असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल नगरात गोळीबाराचा आवाज घुमला. दोन व्यक्तींमध्ये असलेल्या जुन्या वादाचे पर्यावसान भांडणात झाले आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

राजकीय संबंध नसल्याचे स्पष्टीकरण :
मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “हा गोळीबार दोन गटांतील वैयक्तिक वादातून झाला असून, त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.” सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळी ‘बोगस’ मतदाराला दिला :
चोप गोळीबाराच्या घटनेपूर्वी, सकाळी १० वाजेच्या सुमारास आर.आर. विद्यालय मतदान केंद्रावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी एक तरुण बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा संशय आल्याने उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. या ठिकाणी पोलीस अधीक्षक रेड्डी आणि विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतः भेट देऊन जमावाला शांत केले.

बंदोबस्तात वाढ :
एकीकडे बोगस मतदानाचे प्रकरण आणि दुसरीकडे गोळीबार, अशा दोन घटनांमुळे जळगाव शहर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, शांततेत मतदान करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound