जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे शिवसेनेच्या आमदारांमध्ये उभी फूट पडून सत्तांतर झाल्यानंतर आता पदाधिकार्यांनी राजीनामासत्र सुरू केले आहे. यात जळगावात महिला पदाधिकार्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे चारही आमदार आणि एक समर्थक आमदार अशा पाच जणांनी जाण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला होता. यानंतर पदाधिकार्यांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. बंडखोरांच्या विरूध्द जळगाव शहरातून निघालेला मोर्चा, तसेच पक्षाच्या बैठकांमध्ये पदाधिकार्यांनी हजेरी लावली. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आता माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदार जिल्ह्यात परतल्यानंतर पदाधिकार्यांचे राजीनामासत्र सुरू होईल असे मानले जात होते. याची सुरूवात आज जळगावातून झाली आहे.
जळगाव शहरात आज महिला पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले. यात महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष ाशोभाताई चौधरी आणि शहराध्यक्षा ज्योतीताई शिवदे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याच प्रकारे ठिकठिकाणचे पदाधिकारी हे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शोभाताई चौधरी आणि ज्योतीताई शिवदे यांनी आपल्या वैयक्तीक कारणांसाठी आपापल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. आपला कुणावरही रोष नसून आपण शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुखांकडे सुपुर्द केला आहे. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे सध्या महापालिकेच्या महासभेत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात राजीनाम्याचे पत्र दिले आहे.
खालील व्हिडीओ पहा शोभाताई चौधरी आणि ज्योतीताई शिवदे यांनी व्यक्त केलेल्या भावना.