जामनेर/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । करिअरच्या निमित्ताने मोठ्या आशेने चेन्नईला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कॉग्निजंट या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या जय पाटील या तरुणाचा चेन्नई येथील समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या जयचा मृतदेह सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी सातच्या सुमारास हाती लागला असून, या घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी असलेला जय नरेंद्र पाटील (वय २१) रा. पाळधी ता. जामनेर हा बी. ई. शिक्षण पूर्ण करून ५ फेब्रुवारीला चेन्नईतील नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता.

हा चेन्नई येथे कॉग्निजंट कंपनीत इंटर्नशिप करत होता. शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी सुटी असल्याने जय आपल्या मित्रांसह चेन्नई येथील पाँडेचेरी रोडवर असलेल्या समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता. निसर्गाचा आनंद घेत असताना जय आणि त्याचे इतर तीन मित्र समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, याचवेळी समुद्रातून आलेल्या एका रौद्र लाटेने या चौघांनाही ओढले. त्यापैकी तिघे जण थोडक्यात बचावले, मात्र जय पाटील हा लाटेच्या प्रवाहासोबत खोल समुद्रात वाहून गेला आणि बेपत्ता झाला.
दोन दिवसांनंतर सापडला मृतदेह
जय बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि जीवरक्षकांनी शोधमोहीम राबवली होती. दोन दिवस सातत्याने शोध घेतल्यानंतर, सोमवारी सकाळी ७.३० वाजता जयचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला. जयच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. जयचे वडील नरेंद्र पाटील शेतकरी असून, आई शिक्षिका आहे. जयच्या बहिणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे घरातील वातावरण आधीच तणावाचे आहे. बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये आणि आईला धक्का बसू नये, यासाठी या घटनेची माहिती आईला अद्याप देण्यात आलेली नाही. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईला रवाना झाले आहेत.
प्रशासकीय हालचाली आणि पाठपुरावा
या घटनेची दखल घेत जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी चेन्नईतील प्रशासकीय यंत्रणेशी सतत संपर्कात आहेत. “जय पाटील याचा मृतदेह मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंत जामनेर येथे आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन हे स्वतः मंत्रालयातून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, मृतदेह लवकरात लवकर जळगावला आणण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी आणि विमान प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.



