Home राजकीय ब्रेकींग : घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींकडून ‘जीएसटी बचत उत्सवाची’ घोषणा !

ब्रेकींग : घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींकडून ‘जीएसटी बचत उत्सवाची’ घोषणा !

0
167

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, २१ सप्टेंबर रोजी देशाला संबोधित केले आणि ‘जीएसटी बचत उत्सवा’ ची सर्वात मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून (२२ सप्टेंबर) जीएसटीमध्ये केलेल्या नव्या सुधारणा लागू होणार असून, या बदलांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, लहान व्यापारी, महिला आणि युवकांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत आठ वर्षांच्या जुन्या अप्रत्यक्ष कर रचनेत महत्त्वाच्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती. यानुसार, आता ५ आणि १८ टक्के अशा कर दरांची नवीन व्यवस्था लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयासोबत जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होतील आणि उद्यापासून ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होईल.” या उत्सवामुळे लोकांची बचत वाढेल आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेता येतील, असे ते म्हणाले.

गेल्या अनेक दशकांपासून भारतातील सामान्य नागरिक आणि व्यापारी वेगवेगळ्या करांच्या जाळ्यात अडकले होते. जीएसटी लागू करून सर्वांना एकच कर प्रणाली देण्यात आली. आता यामध्ये आणखी सुधारणा करून मध्यम वर्गाला दुप्पट लाभ दिला जात आहे. गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर येऊन मध्यम वर्गात आले आहेत, त्यामुळे त्यांच्या आकांक्षा लक्षात घेऊन सरकारने १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केला आहे.

या नव्या सुधारणांनंतर १२ टक्के दर टप्प्यातील ९९ टक्के वस्तू ५ टक्के दरांच्या श्रेणीत आल्या आहेत, तर २८ टक्के टप्प्यातील ९० टक्के वस्तू १८ टक्के दरांच्या श्रेणीत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. ५ आणि १२ टक्के हे दोनच कर दर असणार असून, यामध्ये सामान्यांना लागणाऱ्या ९९ टक्के जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, आणि याची मोठी जबाबदारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (MSME) आहे. जीएसटी कमी केल्यामुळे आणि नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे देशातील छोट्या उद्योगांना मोठा फायदा होईल. विक्री जास्त आणि कर कमी झाल्यामुळे छोटे व्यापारी आणि एमएसएमई क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound