Home क्राईम ब्रेकींग न्यूज : शाळेच्या निष्काळजीपणामुळे नर्सरीतील दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू !

ब्रेकींग न्यूज : शाळेच्या निष्काळजीपणामुळे नर्सरीतील दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू !

0
258


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समोर आली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीवरून तोल जाऊन ही दोन्ही बालके जवळच्या नाल्यात पडली आणि बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये शाळेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी पहिला बालक अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने), रा. आदर्श कॉलनी, भडगाव येथील, तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने), रा. बालाजी गल्ली, भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

आदर्श कन्या शाळेतील नर्सरी वर्गात शिकणारे हे दोन चिमुकले विद्यार्थी खेळत असताना किंवा वर्गाबाहेर असताना शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ पोहोचले. खेळताना अचानक तोल गेल्याने ते भिंतीवरून थेट जवळच्या नाल्यात कोसळले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचे मृतदेह फुगून आल्यावर ही गंभीर घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

शाळेच्या या निष्काळजीपणावर पालक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका किंवा पुरेसा सुरक्षित कठडा नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा मुख्य आरोप केला जात आहे. यासोबतच, इतक्या लहान वयाच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर एकटे जाण्याची परवानगी का देण्यात आली? वर्गात किंवा परिसरात कार्यरत असलेल्या शिक्षक आणि व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली नाही? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे पालकांसह स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. या गंभीर निष्काळजीपणासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound