एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री गावात एका आदिवासी युवकाला वाढदिवस साजरा करत असताना काही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री घडली होती. या हल्ल्यात राहुल मोरे नामक युवकाचे डोके फोडण्यात आले असून इतर काही युवकही गंभीर जखमी झाले आहेत. तसा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे देखील समोर आले आहे.
या घटनेनंतर एकलव्य आदिवासी युवा संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. संघटनेचे म्हणणे आहे की, गावातील पोलीस पाटील आणि काही स्थानिक लोकांनी मारहाण करणाऱ्यांना पाठबळ दिले. तसेच, पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल न करता तक्रारदारांना हुसकावून लावले. या संदर्भात एकलव्य आदिवासी युवा संघटनेने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, आदिवासी युवकांना केवळ ते दलित असल्यामुळे मारहाण करण्यात आली. हा प्रकार जातीय द्वेषातून घडला असून, पोलिसांनी यात निष्पक्षपातीपणे कारवाई करावी. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.


