मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. या भेटीमुळे राज्यात सत्तेचे नवीन समीकरण उदयास येण्याच्या चर्चेला उधान आले आहे.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुरू झाल्यानंतर आज १३ दिवसांनी दिल्लीसह राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत राज्यातील राजकीय स्थितीवर आमची चर्चा नक्कीच झाल्याचे संजय राऊत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तत्पूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीदेखील आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारच सध्या राज्याला संकटातून बाहेर काढू शकतात, असे सांगितले. त्यामुळे सत्तास्थापनेबाबतची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे.