पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पारोळा तालुक्यासह पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील धुळ पिंप्री येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे एकूण एकूण ४ कामे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय-२८) याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय-५८) यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे पारोळा पंचायत समिती कार्यालयात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.