जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात कौटुंबिक कारणातून पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून प्रकरणी भिकन भाऊराव पवार याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जे जे मोहिते यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा शनिवारी २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता सुनावली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात राहणारा आरोपी भिकन भाऊराव पवार याने कौटुंबिक वादातून पत्नी अन्नपूर्णा भिकन पवार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १८ मे २०१९ रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जखमी अवस्थेत महिलेला धुळे येथील रोडला दाखल केले असता १९ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये फिर्यादी पोलीस पाटील तसेच तपासाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दरम्यान घटनेतील आरोपी भिकन पवार याच्यावर या घटनेच्या तीन महिन्यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर आणण्यात आले. त्यावरून आरोपीने पत्नी अन्नपूर्णा पवार या महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांनी आरोपी भिकन पवार हा जन्म कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल दीपक दिलीप सत्रे आणि पैरवी अधिकारी पोलीस नाईक चेतन ठाकरे यांनी मदत केली.