मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मारुती ईको कारने (क्रमांक MH 46 X 3120) एका अज्ञात ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील मृतांची आणि जखमींची ओळख पटली
या दुर्दैवी अपघातात ईको कारचा चालक साजिद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ), संतोष तेजराव महाले (वय ४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर), आणि तीन अनोळखी महिलांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात पंकज दिलीप गोपाळ (वय २२, रा. नांद्रा हवेली, जि. जळगाव), दीपीका विश्वास (वय ३०, रा. पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांच्यासह एक अनोळखी महिला असे एकूण ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी फिर्यादी अक्षय भास्कर सोनवणे (वय २२, रा. चिखली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ईको कार चालक साजिद बागवान याने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवून हा अपघात घडवला. तो स्वतःच्या आणि कारमधील एक तरूण आणि तीन महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. तसेच इतर ४ जणांना गंभीर जखमी केले.
बेदरकार ड्रायव्हिंगमुळे अपघात
हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



